Shambhu Gopal Prabhu Desai 's Album: Wall Photos

Photo 1,569 of 1,706 in Wall Photos

स्वस्तिपद्मे रेखताना..! ( लेख)) (श्री. शंभू गोपाळ प्रभू देसाई , माजी मुख्याध्यापक, श्रीदामोदर विद्यालय, लोलये ) (लोलये येथील श्रीदामोदर विद्यालयाच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने या शाळेतील 42 वर्षाच्या ( 1972 ते 2014) माझ्या प्रदीर्घ व विक्रमी अशा शिक्षकी कारकीर्दीतील व विशेषतः (2008 ते 2014 या कालखंडातील) मुख्याध्यापकपदावरून उभारलेल्या उद्योगपर्वाच्या इतिहासाचे सिंहावलोकन) मङ्गलम् भगवान विष्णुः, मङ्गलम् गरुडध्वजः। मङ्गलम् पुण्डरीकाक्षः, मङ्गलाय तनो हरिः।। श्री दामोदर विद्यालयाच्या शतकपूर्तीच्या वाटचालीतील एका महत्वपूर्ण व निर्णायक टप्प्यावर मुख्याध्यापक म्हणून शाळेच्या नेतृत्वाची धुरा अत्यंत यशस्वीरीत्या पेलत असतानाच संस्थेच्याही कार्यासाठी सर्वतोपरी पुढाकार घेऊन, नानाविध विलक्षण आव्हानांचा यशस्वी सामना करीत , आयुष्यभर शाळेसाठी पाहिलेली नानाविध स्वप्ने सर्वशक्तीनिशी अथक परिश्रमांचा केतू उभारून व सर्व संबंधितांच्या सहकार्याने प्रत्यक्षात उतरवून शाळेला परमवैभवाप्रत पोचवण्याचा दुर्मिळ योग मला लाभला. तसेच या शिक्षणसंस्थेच्या चौफेर विकासाचे सोनेरी पर्व आत्मबलाने व सर्वांच्या सहकार्याने घडवीत असतानाच अनेकानेक क्षेत्रे आपल्या प्रभेने उजळून टाकणारे अनेकानेक चारित्र्यसंपन्न व राष्ट्रभक्तीने भारलेले विद्यार्थी घडवण्याचेच नव्हे तर सदैव त्यांच्या आपुलकीचे व आदरयुक्त प्रेमाचे धनी होण्याचेही दुर्मिळ भाग्यही ईशकृपेने माझ्या वाट्याला आले हे अभिमानपूर्वक नमूद करावेसे वाटते.हे सारे घडले ते अर्थातच देवदैवतांच्या कृपाशीर्वादाने व विद्यालयाचे आद्य संस्थापक प.पू. श्रीमत् इन्दिराकान्ततीर्थ तसेच परंपरेतील स्वामीमहाराजांवरील अढळ श्रद्धेमुळेच ! अर्थात् समुद्रमंथनातून अमृतासह, लक्ष्मी-कौस्तुभ-पारिजातकादि चतुर्दश रत्नांचा लाभ झाला तरी लोककल्याणासाठी तदंतर्भूत हलाहलाचाही आनंदाने स्वीकार करणे क्रमप्राप्त असते. तसेच ते स्वाभाविकपणे माझ्याकडून ही घडले. हें सिंहावलोकन करताना ज्या अनेकानेक त्यागी कार्यकर्त्यांच्या व शिक्षकांच्या बळावर ही शाळा घडली व नावारूपाला आली त्या सा-यांचे तसेच प्रामुख्याने माझ्या वाट्याला आलेले तेजस्वी उद्योगपर्व साकारण्यासाठी मला व अर्थातच शाळेला लहानापासून थोरांपर्यंत ज्या ज्या आदरणीय व्यक्तींचे उदंड सहकार्य लाभले त्या सर्वांचे प्रेम,आदर व कृतज्ञतापूर्वक स्मरण होणे स्वाभाविक आहे. माझ्या कारकीर्दीतील शाळेच्या इतिहासाचे हे प्रांजळ दर्शन घडवीत असतानाच संबंधितांचे ॠण व्यक्त करणे हाही या लेखाचा एक प्रमुख व प्रामाणिक उद्देश आहे. ज्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी वाटचाल केली ते समाजासाठी व विशेषतः या शाळेसाठी आपले उभे आयुष्य वेचणारे माझे वडील व संस्थेचे माजी अध्यक्ष श्री. गोपाळ रामचंद्र प्रभू देसाई यांच्या रूपाने समाजकार्याचा लखलखता आदर्श मूर्तिमंतपणे माझ्यासमोर उभा होता. त्यातच माझ्या सुदैवाने श्री. मुकुंद बाबूराव नायक, एस्.एस्. बुखारी, श्री.मधुकर वामन चिटणीस,श्री.मनोहर द.आमशेकर यांच्यापासून ते गुरुवर्य प्रा. रमेश सप्रे याच्यापर्यंत अनेकानेक प्रतिभावान शिक्षकांच्या हाताखाल शिक्षण घेण्याचा योग मला लाभला.भगवद्गीतेसह नानाविध सद्ग्रंथांचा व्यासंग, विशेषतः स्वामी विवेकानंदाच्या ग्रंथाचा प्रभाव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्वहिंदू परिषदेच्या विविध कार्यात व अयोध्या संग्रामात कारसेवक म्हणून सहभाग, धार्मिक सेवाकार्यात पुढाकार व या निमित्ताने प. पू. गुरुवर्य श्रीमत् विद्याधिराज तीर्थ स्वामीमहाराजांकडून वेळोवेळी लाभलेले कौतुकाचे शब्द, श्री दामोदर व श्री केशव देवालयाच्या जीर्णोद्धारासाठी घेतलेला पुढाकार, स्थानिक देवालयांच्या व ग्रामसंस्थेच्या दीर्घकालीन हितासाठी घेतलेला पुढाकार, विविध पर्यावरण चळवळीत सहभाग, भ्रष्टाचाराविरुद्ध केलेला अखंड संघर्ष, प्रयत्नपूर्वक जोडलेले स्नेहसंबंध, ही सारी साधना मी सर्वतोपरी श्री दामोदर विद्यालयाच्या कारणी लावलेली व चरणी वाहिलेली आहे . माझ्या शालेय कारकीर्दीतील शेवटच्या ६ वर्षात मुख्याध्यापक पदावरून साधनसुविथांच्या चौफेर विकासासह शाळेला सर्वतोपरी वैभवाच्या शिखरावर पोचवण्यासाठी मला यशस्वी झेप घेता आली ती याच भांडवलावर! पण तत्पूर्वींच्या कारकीर्दीतही मला माझ्या या शाळेसाठी सुदैवाने अत्यंत भरीव योगदान देता आले. याच शाळेतून शिक्षण घेऊन 11 वी ( S.S.C )ची पुणे बोर्डाची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण होऊन व बिकट आर्थिक स्थितीतून पुढील शिक्षण घेत , गणित-विज्ञानामधील B.Sc. पदवीपरीक्षेत कारवारच्या के. जी. सबनीस काॅलेजमधून प्रथम क्रमांक व विशेष प्राविण्यासह कर्नाटक विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत उच्च मानांकन प्राप्त करून तदनंतर M.Sc.(Pre) व पुढे पणजीच्या निर्मला इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन मधून B.Ed. ( मुंबई विद्यापीठ) पदवी , अशा अत्यंत स्पृहणीय शैक्षणिक पृष्ठभूमीबरोबरच, सांस्कृतिक व सामाजिक कार्याची भरभक्कम जोड संपादन करीत या शाळेसाठी शिक्षक म्हणून सुरवातीची ३६ वर्षे विद्यादानाचे पवित्र कार्य करीत असताना होतकरू विद्यार्थ्याच्या माध्यमातून सांगाती सारख्या अनेक प्रतिष्ठित स्पर्धातून वक्तृत्व, कथाकथन, विज्ञाननिबंध, विज्ञानप्रकल्प, विज्ञानमंडळ, व गणित विषयाशी संबधित अनेकानेक स्पर्धात मी शाळेसाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवरही वेळोवेळी सर्वोच्च पुरस्कारांसह नेत्रदीपक यश मिळवू शकलो , एवढेच नव्हे तर अनेकानेक विद्यार्थ्याना चारित्र्याचे, राष्ट्रभक्तीचे व सदैव उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याचे संस्कारही देऊ शकलो. माझ्याकडून भाषा व विशेषतः गणित-विज्ञानाचे धडे घेतलेले विद्यार्थी संशोधनच नव्हे तर उच्च पातळीवर गणित- विज्ञानाचे अध्यापन, I.I.T. ( J.E.E.), A.I.E.E.E. सारख्या राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेच्या आव्हानात्मक स्पर्धापरीक्षा साठी मार्गदर्शन, अभियांत्रिकी, वैद्यकी, माहिती तंत्रज्ञान, उद्योग, व्यवस्थापन, प्रशासन, कायदा, कला, अभिनय, संघकार्य, संस्कृत भारती, ललित साहित्य अशा राष्ट्रीय विकासाच्या सर्वच क्षेत्रात चमकत आहेत ही अत्यंत अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे.या ३६ वर्षात शाळेसाठी ईशकृपेने मी जे काही करू शकलो त्याची धावती ओळख करून देण्यास माझे त्याकाळातील विद्यार्थी श्री. व्यंकटेश प्रभू देसाई (Ex.Scientist : NAL & NIO; Director , Aryan Study Circle & AMHSC Goa) यांनी माझ्या षष्टयब्दिपूर्तीनिमित्त 5 फेब्रुवारी 2014 रोजी स्वयंस्फूर्तीने 'गोवा दूत' या वृत्तपत्रातून लिहिलेला 'तेथे कर माझे जुळती' हा लेख पुरेसा आहे. यापुढे मुख्याध्यापकपदावरून या विद्यालयासाठी व पर्यायाने संस्थेसाठी अनेकांच्या सहकार्याने व परमेश्वरी कृपेने माझ्या हातून घडलेले कार्य व या कार्यात केव्हा केव्हा कोणी कोणी कसे कसे बहुमोल सहकार्य केले त्याचा तपशीलवार उल्लेख हा एका प्रदीर्घ लेखाचा विषय असल्याने प्रस्तुत लेखाच्या मर्यादेत त्याचा संपूर्ण आढावा घेणे कठीण आहे. त्यापैकी बहुतेक मदतकर्त्या महानुभावांचा उल्लेख शाळेच्या 'अमृतानुभव' या आमच्या शाळेच्या स्मरणिकेत ( अथवा शाळेच्या इतिहासाचे साधनभूत असलेल्या वार्षिक अहवालात) मी अगोदरच करून ठेवलेला आहे . त्या सर्वाचे ऋण मी पुनश्च अत्यंत कृतज्ञतापूर्वक व्यक्त करीत आहे. येथे फक्त या सा-याचा धावता उल्लेखच काय तो शक्य आहे. कर्तव्यदक्ष व प्रेमळ सहशिक्षक व सहकारी वर्गाच्या सहकार्याने शाळेच्या इतिहासात प्रथमच S.S.C परीक्षेत 100% निकालाच्या उपलब्धीसह अनेकानेक नाविन्यपूर्ण, सुंदर व प्रबोधनपर उपक्रम राबवून नानाविध अनुभवांनी विद्यार्थीजीवन समृद्थ करीत, गुरुजनांचा परोपरीने आदरसन्मान करीत, विविध क्षेत्रांत उत्कृष्ट यश संपादन करीत तसेच अनेकानेक क्षेत्रांतील दिग्गज अशा प्रतिभावंताचा समागम शाळेला घडवीत शाळेचा चौफेर शैक्षणिक विकास साधत असतानाच अत्याधुनिक साधनसुविधांची निर्मिती करून विद्यालयाच्या सर्वंकष विकासाचे पर्व उभारण्यासाठी पहिली गरज होती ती शाळेच्या नूतन इमारतीचे स्वप्न साकारण्याची ! बराच काळ निधीच्या अभावी केवळ तळमजल्याचा सांगाड्याच्या रूपात पडून राहिलेले हे काम पहिल्या मजल्यासह पूर्ण करण्यासाठी गरज होती ती सरकारकडून माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुरस्कृत साधनसुविधा अनुदानवजा कर्जाचा १० लक्ष रू.चा दुसरा हप्ता मिळवण्याबरोबरच तत्कालीन मुख्यमंत्री श्री दिगंबर कामत पुरस्कृत व ७५ वर्षे पूर्ण झालेल्या शाळेसाठी असलेल्या २५ लक्ष रुपयांच्या एकरकमी अनुदान योजनेचा (OTGS) लाभ मिळवण्याची. पण त्यासाठी एकतर साधनसुविधा अनुदानवजा कर्जाचा पहिला हप्ता वापरल्याचा तपशील सरकारकडे सुपुर्द करणे आवश्यक होते. तो तर मी प्रयत्नपूर्वक सुपुर्द केलाच. दुसरीकडे एकरकमी अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रथमदर्शनी पुराव्यांसह नाना प्रकारचे सोपस्कार व बराच काळ प्रलंबित असलेली संस्थेची अत्यावश्यक कामे मोठ्या प्रयत्नपूर्वक पूर्ण करून व इतर अनेक आवश्यक कागदपत्र मोठ्या जिकीरीने संपादन करून मी आमच्या विनंती अर्जाची फाईल लगोलग थेट तसेच स्वामीमहाराजांमार्फतही मुख्यमंत्र्याकरवी शिक्षणसंचालकांकडे पाठवून दिली. पण शिक्षणसंचालकपदी असलेली एरवी शिस्तप्रिय पण खाष्ट ख्रिश्चन बाई शाळेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याचे निर्णायकपणे सिद्ध केल्याशिवाय दाद देईना. अर्थातच ते सिद्ध करण्याचे कडवे आव्हान माझ्यासमोर होते. हरप्रकारे प्रयत्न करूनही यासंबंधी कोणतेही कागदपत्री पुरावे तर उपलब्ध होईनात. शेवटी इरेला पेटून दामोदर देवस्थानातील पोर्तुगीजकालीन जुन्या कागदपत्रातील मोडी लिपीतील लिखाणाचे अत्यंत परिश्रमपूर्वक संशोधन करून आवश्यक ते संदर्भ मिळवण्यात व शक-सालाची सांगड घालून शाळेला निर्णायकपणे 75 वर्षाहून जास्त वर्षे पूर्ण झाल्याचे सिद्ध करण्यात मला यश लाभले. पण तरीही आपल्याकडे मोडी लिपीचा तज्ञ नसल्याचे निमित्त करून ही बाई दाद देईना. शेवटी सर्व दिशांनी माहिती काढून माझ्या थोरल्या बंधूचे मेहुणे डॉ. राजीव कामत यांच्या मध्यस्थीने त्यांचे जवळचे नातेवाईक असलेले पुरातत्व खात्याचे माजी संचालक डाॅ. शंकर कामत म्हामाई यांची भेट घेऊन त्यांच्याकडून आमचा शाळेला ७५ वर्षाहून जास्त वर्षे पूर्ण झाल्याचा माझा सप्रमाण दावा खरा असल्याचे अधिकृत पत्र मिळवण्यातही मला यश मिळाले. सदर पत्रासह सर्व आवश्यक गोष्टी शिक्षणसंचालिकेपाशी सुपुर्द करूनही झारीतील शुक्राचार्याची भूमिका घेतलेला ती बाई अडेलतट्टूपणा करीत असल्याचे पाहून मला थेट मुख्यमंत्र्याकरवी तिला कानपिचक्या देऊन एकरकमी अनुदानाचा मार्ग मोकळा करून घ्यावा लागला. अशा रीतीने अक्षरशः भगीरथ प्रयत्नातून व मूलगामी संशोधनातून एकाहून एक आव्हाने यशस्वीरीत्या पेलून व केवळ पुढाकारच नहे तर सातत्याने व चिकाटीने पाठपुरावा करून शिक्षणखात्यामार्फत एकरकमी अनुदान २५ लक्ष रुपये व Infrastructure Loan दुसरा हप्ता 10 लक्ष रु . संपादन करून नूतन इमारतीचे काम मार्गी लावण्यात मला यश मिळालेच. नूतन इमारतीच्या बांधकामाचा मार्ग अशा रीतीने प्रशस्त होत असतानाच गणित विषयाचे प्रश्नसंच तयार करण्यासाठी माझ्या बरोबरीने काम केलेल्या कुडचडे येथील न्यू इंग्लिश हायस्कूल च्या ज्येष्ठ शिक्षिका कलावती आंगले याच्यामुळे माझ्या परिचयात आलेले त्यांचे नातलग व ग्लोबल कॅपिटल मार्केटचे अध्यक्ष वै. श्री संजय हेगड़े यांची ( कृष्ण सावित्री चॅरिटेबल ट्रष्ट द्वारा ) ५ लक्ष रू. ची, तसेच माझे स्नेही वै.श्री.रंगनाथ आचार्य यांच्यामुळे माझ्या परिचय व संपर्कात आलेल्या विख्यात लेखिका माधवी देसाई यांच्या मध्यस्थीने सार्वजनिक बाधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या ढवळीकर ट्रस्टची ५ लक्ष रू.ची आर्थिक मदत मिळवून व तानशी येथील सद्गृहस्थ श्री राम गावकर यांची १.२५ लक्ष रू.ची बहुमोल मदत मिळवून विद्यालयाच्या नूतन शोभिवंत वास्तूच्या निर्मितीचाच नव्हे तर शाळेच्या इंदिराकांततीर्थ सभागहाच्या कोटा फरशा वापरून सुशोभीकरणाचाही मार्ग प्रशस्त करण्यात मला यश लाभले. विद्यालयाच्या नूतन वास्तूत विद्युतसाधने व अन्य आनुषंगिक साधनसुविधा निर्मितीसाठी माझे शेजारी श्री अरूण माधव भट यांची स्नुषा सौ. प्रियागा अर्वेश भट (त्याकाळी पूर्वाश्रमीची चि.सौ.कां . सपना सरमळकर ) यांच्या सौहार्दाने सिप्ला कंपनीकडून नूतन इमारतीसाठी विद्युतसाधने व त्यांच्या जोडणीसह इतर विशेष मदत लाभली. तसेच विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री.उमेश जीवोत्तम नाईक यांच्याकडूनही फर्निचर प्रित्यर्थ बहुमोल मदत लाभली. वेळोवेळी त्यांची विविध प्रकारे बहुमोल मदत आम्हाला लाभली आहे अशाच संशोधनाच्या व पाठपुराव्याच्या बळावर वैयक्तिक प्रतिष्ठा पणाला लावून व सरकारी कार्यालयातील लाल फीतीच्या कारभाराला कौशल्याने व शिताफीने बगल देऊन १९ लक्ष रु. क्रीडांगण अनुदान पदरी पाडून घेऊन भव्य क्रीडांगणाचे काम मार्गी लावण्यातही मला यश लाभले. याकामी क्रीडाखात्याच्या तत्कालीन सहृदय उपसंचालिका ज्युलियाना ह्यांचे बहुमोल सहकार्य लाभले. शाळेसाठी भव्य अशा क्रीडांगणाचे हे स्वप्न गेली अनेक वर्षे मी पहात होतो. त्यासाठी क्रीडासंचालनालयाची अनुदान योजनाही होती. पण येथेही अनेकानेक किचकट सोपस्कारांच्या जोडीला एक बिकट आव्हान माझ्यासमोर उभे होते.ज्या जमिनीचे क्रीडांगणात रूपांतर करावयाचे होती त्या जमिनीचा रीतसर मालकीहक्कच सुस्पष्टपणे शाळेच्या वा संस्थेच्या नावे नव्हता. क्रीडांगण निर्मितीसाठीच नव्हे तर शाळेच्या दीर्घकालीन हितासाठी व विविध भविष्य कालीन योजनासाठी ही जमीन संस्थेची असल्याचे सिद्ध करून रीतसर संस्थेच्या नावे करून घेणे अत्यावश्यक होते.श्री दामोदर देवालयाने शाळेला दान म्हणून दिल्याचे केवळ ऐकिवात असलेली ही (4050 चौ.मी.) जमीन देवालयाने शाळेसाठी संस्थेला दान रूपाने दिल्याचे देवालयाच्या पोर्तुगीज कागदपत्रांचे अध्ययन करून व प्रदीर्घ संशोधनपूर्वक सिद्ध करूनच नव्हे तर महत्प्रयत्नाने ती संस्थेच्या नावे करून घेण्याचे कामही मी पूर्ण केले. या कामी गावचे सुपुत्र व अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री प्रसन्न अरविंद आचार्य यांची बहुमोल मदत लाभली.शाळेच्या वसतिगृहा साठी सुद्धा फोमेंतो कंपनीकडून भरघोस साधनसामुग्री मिळवून देण्याच्या कामीही त्याचे बहुमोल सहकार्य लाभले. याच काळांत शाळेला समाज-कल्याण खात्यातर्फै पहिला बालरथही लाभल्याने एक दीर्घकाल प्रतीक्षित असलेली गरज पूर्ण झाली. नूतन इमारत बांधकाम व क्रीडांगणाच्या निर्मितीसाठी संस्थाचालकांकरवी सर्वसंमतीने विविध सुयोग्य कंत्राटदाराना कामाची क॔त्राटे देण्यात आलेली असली व त्यापैकी एकदोन बाबींवर माझ्या सहका-यांकरवी अंशतः देखरेखीचीही व्यवस्था करण्यात आलेली असली तरी कामाचा दर्जा उत्तम असावा , ऐन वेळी उद्भवणा-या अडचणींवर त्वरित तोड़गा निघावा व पैशाचा विनियोगही योग्य प्रकारे व्हावा यासाठी सा-याच कामांवर जबाबदारीने लक्ष ठेवणे मला भाग होते. मोठ्या प्रयत्नपूर्वक संपादन केलेले धन नीट कारणी लावण्यासाठी ज्यांची मदत झाली ते वास्तुविशारद श्री.मंदार उपासनी व श्री जयेश फडते तसेच सर्व कंत्राटदार तर अभिनंदनास पात्र आहेतच. शिवाय वेळोवेळी शाळेसाठी मदतीचा हात पुढे करणा-या विशेषतः श्री. वेदव्यास उर्फ बाळ परशुराम आचार्य यांच्याप्रमाणेच शाळेमागील संलग्न जमिनीचा पट्टा शाळेसाठी ऊपलब्ध करून देणारे (सर्वश्री चंद्रशेखर आचार्य, विश्वेश आचार्य, देवदत्त आचार्य, दामोदर आचार्य प्रभृती ) आचार्य कुटुंबीय , श्री सुमुख प्रभू देसाई , तसेच अभियंते श्री. मनोज आमशेकर , माजी विद्यार्थी कॅप्टन ऍडी व्हियेगश,कंत्राटदार दर्शन प्रभू गावकर ,सर्व्हेयर श्री सुभाष पागी ह्यांचे योगदान शाळेला लाभलेले आहे. तसेच स्थानिक पंचायत, विद्युत खात्याचे अभियंते श्री.गोविंद भट यांसह विविध सरकारी खात्यांचे अधिकारी, वास्तुविशारद श्री.योगेश प्रभू गावकर यांचेही योगदान शाळेला लाभलेले आहे. श्री दामोदर व श्री केशव या उभय देवालयांचे ॠण तर कधीही न फिटणारे आहे. माझ्या आग्रहाच्या विनंतीवरून,अनेकानेक सुंदर व प्रबोधनपर कार्यक्रमांच्या निमित्ताने शाळेला भेट देऊन विद्यार्थ्याना परोपरीने सन्मार्ग दाखविणा-या ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. भिकू पै आंगले, गुरुवर्य प्रा श्री. रमेश सप्रे, विख्यात लेखिका माधवी देसाई, संस्कृत तज्ञ श्री.शिरीश भेडसगावकर , सिद्धहस्त कोकणी लेखक श्री. दामोदर मावजो, सुप्रसिद्ध वास्तुविशारद व पर्यावरणतज्ञ श्री कमलाकर साधले , गुजरात उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश श्री.गुरुदास कामत, चिन्मय मिशनचे प. पू. प्रल्हाद चैतन्य जी , प्रा. नारायण भा. देसाई , डाॅ. सच्चिदानंद शेवडे, वे.शा. सं.प्रा. सदाशिव टेंग्से , ह.भ.प.श्री.निशाकांत टेंगसे, सुप्रसिद्ध कायदेतज्ञ सतीश सोनक, पर्यावरणतज्ञ प्रा.राजेंद्र केरकर , प्रा. श्री. दिलीप बेतकीकर, प्रा.अनिल सामंत, प्रा .रत्नाकर लेले, प्रा.विवेक कामत, डाॅ.अजय वैद्य, प्रा यशवंत पराडकर, सुप्रसिद्ध कर्करोगतज्ञ श्री. शेखर साळकर,ह.भ.प.नारायण बुवा काणे, पर्यावरणतज्ञ श्री रमेश गावस, सुप्रसिद्ध विज्ञानमित्र श्री.विजयकुमार वेरेंकर, सन्मित्र व साखळीच्या प्रोग्रेस हायस्कूलचे तत्कालीन अध्वर्यू श्री. नरसिंह उर्फ नारायण गोविन्‍द भटगावकर ,पैंगीण येथील श्री.श्रद्धानंद विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व ज्येष्ठ शिक्षण तज्ञ श्री.फ. य. प्रभू गावकर या व अशा अनेक ऋषितुल्य व्यक्तींचा तर मी ऋणी आहेच. माझ्या विनंतीवरून विद्यालयाला परोपरीने विविध प्रकारे मदत करणा-या उपरोल्लेखित महनीय / दानशूर व्यक्तीं शिवाय माझ्या हाकेला ओ देऊन शाळेला साधनसामुग्रीविकासासाठी मदत करणारे श्री वल्लभ पै ( दूरदर्शन संच ), मा.खासदार श्री. रमाकांत आंगले ( L.C.D. प्रोजेक्टर व D.V.D. प्लेयर ), M.E.S चे अध्यक्ष मा. श्री.परेश जोशी ( आर्थिक मदत), श्री. राकेश करमली (ग्रंथालयासाठी आर्थिक मदत ) , खासदार शांताराम नाईक ( संगणक,लैपटॉप्स, प्रतिमुद्रा यंत्र) , श्री.गौतम भेंडे व रोटरी क्लब पणजी ( लॅपटॉप ) यांचा, आत्मीयतेने शाळेला मदत करणा-या इतर अनेकांचा व Internet जोडणी,पुस्तके व अन्य विविध साधनसुविधा पुरविणा-या शासकीय यंत्रणेचाही मी मनःपूर्वक आभारी आहे.रोटरी क्लबसारख्या सेवाभावी संस्था, फोमेतो, सिप्ला यांसारखे उद्योग समूह , स्थानिक बँका व इतर अनेकानेक दानशूर व्यक्तींचे ऋण व्यक्त करणे हे माझे कर्तव्य आहे.शिवाय शाळेवरील प्रेमापोटी शाळेला अनेकानेक माजी विद्यार्थ्याकडून भरघोस आर्थिक मदत लाभली आहे यांचाही मी आवर्जून उल्लेख करीत आहे. अक्षरशः 'अनंत हस्ते कमलावराने' ...म्हणावे तशा या ईश्वरी कृपेचा साद्यंत उल्लेख करणे या लेखाच्या आवाक्यापलीकडचे आहे. मुख्याध्यापक म्हणून जेमतेम सहाच वर्षे माझ्या हाती असणार आहेत याचे भान ठेऊन तेवढ्या मुदतीत आजवर शाळेसाठी पाहिलेली सारी स्वप्ने मला साकार करायची होती. शाळेची भव्य व शोभिवंत नूतन वास्तू व व भव्य अशा नूतन क्रीडांगणाची निर्मितीच नव्हे तर P.W.D च्या सहकार्याने शाळेच्या प्राकारासाठी संरक्षक भिंत व (आतापर्यंत असलेल्या अरुंद वाटेऐवजी आपले बाहू उभारून सर्वाना प्रेमाने कवेत घेणा-या ) सुबक प्रवेशद्वारासह भव्य अशा सोपानमार्गाची निर्मिती, शाळेच्या भरभक्कम आधारासाठी कन्या वसतिगृह शाळेला जोडून घेणे व विद्यार्थी वसतिगृहासाठीही Directorate of Tribal Welfare कडून प्रतिवार्षिक नियमित व भरीव आर्थिक अनुदान संपादन करणे, सर्वसामान्य विद्यार्थ्यानाही स्वावलंबी व आत्मविश्वाससंपन्न बनता यावे व अर्थार्जनासाठी गावच्या तरुण पिढीला नाईलाजाने कराव्या लागणा-या स्थलांतरालाही आला घालता यावा यासाठी पुण्याच्या LAHI या संस्थेच्या मदतीने 'स्वाधीन' सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीरीत्या राबविणे , पंचायतीच्या मदतीने पंचायतीच्या विहिरीतून पंपाने शाळेसाठी पाणीपुरवठा करवून घेणे,...अशी अनेकानेक कामे जिद्द , चिकाटी व परिश्रमांच्या बळावर मी पूर्ण करू शकलो याचा मला रास्त अभिमान आहे. याशिवाय शाळेला स्थानिक ग्रामसंस्थेकडून भावी योजनांसाठी 1 लाख चौ.मी.आकाराचा मोठा भूखंड मिळावा , श्री केशव देवालयाच्या विहिरीतूनही शाळेला पाणीपुरवठा व्हावा व एवढेच नव्हे तर शाळेला नूतन प्रसाधनगृह व एखादे विज्ञानकेंद्रही मिळावे यासाठी व शाळेला सातत्याने संख्याबल लाभावे म्हणून तिला प्राथमिक विभागही जोडून घेता यावा यासाठीही संबंधितांशी अर्ज सादर करून मी प्रयत्न चालवले होते. पैकी केशव देवालयाकडून विहिरीसाठी व सरकारकडून नूतन प्रसाधनगृह व प्राथमिक विभागा साठी मंजुरीही मिळाली होती. याशिवाय मुलांसाठी शक्य झाल्यास खासदार निधीतून अथवा अन्य माध्यमातून नूतन विद्यार्थीवसतिगृहाची निर्मिती करण्यसाठीही मी प्रयत्नरत होतो. संकल्पित नूतन वसतिगृहासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचे अभिवचन वै.श्री नारायण आचार्य यांच्या कुटुंबियांकरवी देण्यात आले होते.माझे मामेबंधू श्री.पवन परशुराम भट यांनी माझ्या विनंतीवरून संकल्पित वसतिगृहाच्या विनामूल्य काढून दिलेल्या आराखडा व अंदाजपत्रकासह आमचा वसतिगृहासाठीचा अर्ज खासदार शांताराम नाईक यांच्याकडे सुपुर्द करून हे प्रयत्न चालू होते . मात्र नवी अधिक चांगली योजना येऊ घातल्याचे कळल्याने काही काळ थांबणे भाग होते. या वेळेपर्यंत माझ्या विरोधकांनी हस्ते-परहस्ते चालवलेल्या नानाविध निष्फळ कारस्थानांना व नानाविध अग्निदिव्यांना यशस्वीपणे तोंड देत भरधाव पुढे चाललेला माझा विजयरथ माझ्या कार्यकाळाच्या अखेरपर्यंत येऊन पोचला. त्यामुळे या शेवटच्या संकल्पित कामांपैकी काही माझ्या निवृत्तीनंतर फलद्रूप होणे क्रमप्राप्त होते ! विशेषतः आपल्या अभिवचनाला जागून श्री. देवदत्त नारायण आचार्य यांनी (स्वतःच्या आर्थिक मदतीशिवाय ) वेळोवेळी शाळेला परोपरीने मदत करीत आलेले आपले ज्येष्ठ चुलतबंधू श्री. वेदव्यास उर्फ बाळ आचार्य याच्याकरवीं त्यांची जमीन संकल्पित वसतिगृहासाठी मिळवून दिल्याबद्दल उभयतांचे आत्यंतिक ऋण नमूद करणे हे माझे कर्तव्य आहे. वर संगितल्याप्रमाणे सरकारी योजनांप्रमाणेच माझ्या व्यक्तिगत स्नेहसंबधाचा व ओळखींचा वापर करून तसेच अनेकानेक शासकीय- बिगरशासकीय संस्था व उदार सदगृहस्थांशी संपर्क साधून पैशाचाच नव्हे तर साधनसामुग्रीचाही प्रचंड ओघ शाळेकडे वळवून व उपरोक्त नानाविध स्वप्ने प्रयत्नांच्या पराकाष्ठेने प्रत्यक्षात उतरवून शाळेच्या सर्वंकष विकासाचे पर्व उभे करण्यात मी यशस्वी ठरलो होतो ! शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा भार हाती आल्यावर इथल्या एकंदर स्थितीचा विचार करून संस्थेच्याही कार्याची धुरा शिरावर घेऊन शाळेच्या चौफेर विकासासाठी हे सर्व करण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. माझी शाळा या नात्याने तिच्या ॠणातून उतराई होण्यासाठी अर्थातच ते माझे कर्तव्यही होते. अर्थातच या सा-या प्रयत्नांना संस्थाचालकांची संमती होतीच. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवीत एकीकडे आत्मीयतेने समाजाला परोपरीने मदत करून शाळा हे ख-या अर्थाने एक सामाजिक केंद्र बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना व शालासमूहासह शिक्षणक्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्वच घटकांशी उत्कृष्ट व आपुलकीचे संबंध प्रस्थापित व वृद्धिंगत करीत त्या सर्वाच्या सहकार्याने शाळेची धुरा समर्थपणे पेलीत असताना दुसरीकडे विविध शैक्षणिक उपक्रमांबरोबरच पूर्वापार चालत आलेले कला-क्रीडा-संस्कृती, ज्ञान-विज्ञान -पालकांशी हितगुज इत्यादि क्षेत्रातील बिगरशैक्षणिक उपक्रम नव्या उमेदीने व उत्साहाने चालू ठेवण्याशिवाय त्यांना पतंगमहोत्सव, सांघिक सूर्य नमस्कार साधना, आदरणीय गुरुजनांचा परोपरीने सत्कार, पुराणवस्तु संग्रह, स्थानिक लोकवेदाचे संकलन व जतन, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, हस्तकौशल्यास व स्वावलंबनास प्रोत्साहन , औषधी वनस्पती उद्यान, माजी विद्यार्थी गुणगौरव, माझा आल्बम, कलादालन, विद्यार्थी समुपदेशन, Smart School, Ideal School अशा अनेकानेक नाविन्यपूर्ण उपक्रमांचीही जोड देऊन शाळेला सर्वांगानी समृद्थ करीत शाळेची कीर्तिपताका डौलाने फडकत ठेवण्यासाठी माझ्या सहका-यांना बरोबर घेऊन मी अविरत प्रयत्न करीत होतो. हे सगळे घडत असतानाच एक प्रथितयश अध्यापक म्हणून मी प्रयत्नपूर्वक संपादन केलेल्या प्रभुत्वाचा आणि अनुभवाचा लाभ काणकोण तालुक्यांतल्या विविध शाळांनीच नव्हे तर गोमंतकातल्या सुदूर ठिकाणच्या शालेय तसेच महाविद्यालयीन पातळीवरीलही अनेक विद्यार्थ्यानी घेतला आहे हे अभिमानपूर्वक नमूद करण्यासारखे आहे. अखिल गोवा गणित शिक्षक संघटनेचा उपाध्यक्ष ह्या नात्यानेही विज्ञानाप्रमाणेच गणिताच्या क्षेत्रातही अनेक उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्याचाही योग मला लाभला. शैक्षणिक , सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात वावरणा-या अनेकानेक संस्थाशी संबंध राखून शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना लायन्स क्लब, भारत विकास परिषद सारख्या अनेक संस्थांकडून लाभलेल्या सत्कारांसह, मराठी विज्ञान परिषद, VIPNET साख्या संस्था व मडगावच्या चौगुले कॉलेजचे माजी प्राचार्य श्री. शिरगुरकर , ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मा.श्री.दामोदर मावजो, महाराष्ट्र विधान परिषदेचे तत्कालीन सदस्य व विलासपूर केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोकराव मोडक या व अशा अनेक महनीय व दिग्गज व्यक्तींच्या प्रशंसोद्गारांचाही लाभ मला वेळोवेळी झालेला आहे. या सर्व प्रवासात केवळ लौकिक शिक्षण व शाळेच्या भौतिक विकासावरच लक्ष केंद्रित न करता भारतीय संस्कृतीतील उदात्त व श्रेष्ठ अशा जीवनमूल्यांच्या संवर्धनावर अखंड भर देत, कोणत्याही प्रलोभनांना अथवा दबावाला बळी न पडता मी माझा कार्यकाल पूर्ण करू शकलो याचा मला रास्त अभिमान आहे.विशेषतः नवीन शिक्षकांची नेमणूक करताना , माझ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून सर्वतोपरी उत्कृष्ट अशा शिक्षकांची निवड करण्यावर माझा कटाक्ष असे ! अशा प्रकारे शाळेचे एका आदर्श गुरूकुलात रूपांतर करण्यासाठी चाललेल्या माझ्या या अथक प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर माझ्या मुख्याध्यापकपदाच्या कारकीर्दीत एकदा तरी प. पू . स्वामी महाराजांचे मंगल चरण शाळेला लागावे असे मला नेहमीच मनोमन वाटत होते . श्री नारायण रामचंद्र प्रभू गावकर प्रभृती माझ्या अनेकानेक सुहृद स्नेह्यांच्या सहाय्याने अनेक अडथळ्यांना समर्थपणे तोंड देऊन शाळेला ८८ वर्षे पूर्ण होत असताना नंदन संवत्सर,पौष वद्य सप्तमी (भानुसप्तमी), शनिवार दि. २ फेब्रुवारी २०१३ या शुभ मुहुर्तावर प.पू. श्रीमत् विद्याधिराजतीर्थ स्वामीजींच्या मंगल हस्ते शाळेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनाचा हा दुर्लभ योगही आम्हाला घडवून आणता आला. यानिमित्ताने स्वामीजींचा मंगल आशीर्वाद माझ्यासह सर्व उपस्थितांना लाभला. या प्रसंगी 'अमृतानुभव' या स्मरणिकेच्या प्रकाशनासह ज्यानी ज्यानी शाळेसाठी परोपरीने आपले योगदान दिले त्या महानुभावांचा स्वामीजींच्या हस्ते सत्कारही घडवता आला.' हा सुंदर व अप्रतिम सोहळा पाहून श्री संस्थानच्या पंचशताब्दी महोत्सवाची आठवण झाली' अशा शब्दात प.पू. स्वामीमहाराजांकडून या एकूण सोहळ्याबद्दल मुक्त कंठाने काढलेले प्रशंसोद्गार ऐकण्याचेही भाग्य लाभले. शिक्षक व सहकारी वर्गाच्या उत्कृष्ट सहकार्यातून तसेच लगोलग दुस-याच दिवशी अर्थात् ३ फेब्रुवारी २०१३ रोजी कला आणि संस्कृती संचालनालयाच्या सौजन्याने , प्रख्यात संगीतकार अशोक पत्की यांच्या चमूने सादर केलेल्या, मधुर स्वरांनी चिंब भिजलेल्या 'अमृतसंध्ये'सह सर्वांगसुंदर व भव्य असा हा कार्यक्रम संपन्न झाला. शाळेच्या इतिहासात सुवर्णाक्षरानी नोंदण्याजोगा हा ऐतिहासिक क्षण व्यक्तिशः माझ्या आयुष्यातील तर परमोच्च आनंदाचा क्षण होता.या अमृतानुभवाने माझ्या जीवनाला कृतार्थता लाभली.अशा रीतीने आजवर 'रत्नैर्महार्हैस्तुतुषुर्न देवाः, न भेजिरे भीमविषेण भीतिम् । सुधां विना न प्रययुर्विरामं, न निश्चितार्थात् विरमन्ति धीराः॥ , या ब्रीदाला जागून घडलेली ही ईश्वरसेवा व यानिमित्ताने आजवर केलेली सारी तपश्चर्या आज फळाला आली होती. आता काहीही लभ्य उरले नव्हते ! अशा प्रकारे यशाचा अमृतकलश हाती लागल्यावर त्यात विनासायास वाटेकरी होण्यासाठीच नव्हे तर तो अलगद आपल्याकडे ओढून घेण्यासाठी अनेक हात पुढे सरसावणे स्वाभाविक असते. मात्र निखळ सत्य फार काळ लपून रहात नाही व लपवून ठेवताही येत नाही. असो. ...... माझ्या चौफेर यशामुळे बिथरलेल्या काही मंडळीकडून आपापल्या स्वभावानुरूप माझ्या शाळेसाठीच्या संकल्पित कार्यानाच नव्हे तर प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या यशाला व श्रेयालाही हस्ते-परहस्ते सुरुंग लावण्याचे आजवर सर्व प्रकारचे प्रयत्न घडलेले असले तरी, देव उदार अंतःकरणाने त्या सर्वाना क्षमा करो व सद्बुद्धि देवो अशी मी त्याच्यापाशी मन:पूर्वक प्रार्थना करीत आहे. ''तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा । पूजा केली होय अपारा। तोषालागी।।' या उक्तीनुसार ईशकृपेने या शाळेला परमवैभवाप्रत पोचवण्यासाठी शाळा व संस्थेसाठी सर्वतोपरी पुढाकार घेऊन ही सारी कामे करण्याची संधी मला लाभल्याबद्दल मी परमेश्वराचा ऋणी आहे. ही सेवा मान्य करून परंपरेतील स्वामीमहाराजांचा आशीर्वादही मला तसेच सकल सुहृदांना लाभत राहो व सत्प्रवृत्तींचा अधिकाधिक सुकाळ होऊन या शिक्षणसंस्थेला उत्तरोत्तर अधिकाधिक यश लाभत राहो अशी त्या जगन्नियंत्यापाशी मनःपूर्वक प्रार्थना करून तसेच सर्व प्रकारचे सावट दूर होऊन सत्याचा मार्ग प्रशस्त व्हावा या हेतूने, विद्यमान मुख्याध्यापकांच्या व सहशिक्षकांच्याही विनंतीवरून लिहिलेल्या या लेखाला माझ्या समस्त विद्यार्थीवर्गाचे पुनश्च प्रेमपूर्वक स्मरण करीत विराम देत आहे ! सर्वेsपि सुखिन: सन्तु , सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दु:खमाप्नुयात् || ॐ शांति: शांति: शांति:।। ( श्री. शंभू गोपाळ प्रभू देसाई, माजी मुख्याध्यापक, श्री. दामोदर विद्यालय, लोलये , काणकोण, गोवा.)