कुरु वंशातील, परिक्षीत राजाचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला. ज्याने दंश केला, तो तक्षक, कद्रू आणि कश्यपाचा पुत्र होता. शृंगऋषीच्या शापपूर्तीसाठी तक्षकाने राजा परीक्षितास दंश केला होता, ही पौराणिक कथा आहे. राजा जनमेजय, हा राजा परीक्षिताचा पुत्र, आणि हस्तिनापूरचा सम्राट ! त्याला आपल्या पित्याचा मृत्यू हा, तक्षकाच्या दंशामुळे झालेला आहे, हे माहीती होते.
त्याने आपल्या पित्याच्या अशाप्रकारे मृत्यूचा प्रतिशोध म्हणून, सर्पयज्ञ आरंभीला. त्यामुळे यज्ञकुंडाच्या आहुतीत सर्व सर्प धडाधड येऊन पडू लागले. तक्षकाने घाबरून जात, साक्षात इंद्रदेवाचा आश्रय घेतला. इंद्राच्या सामर्थ्यापुढे, हा सर्पयज्ञ विफल होईल, ही त्याची आशा, किंवा त्याला असलेली खात्री ! हे समजल्यावर, राजा जनमेजयाने, त्या तक्षकाला जो सहाय्य करेल, त्याच्यासह आहुती या यज्ञकुंडात देऊन त्याला भस्म करा, अशी आपल्या यज्ञकर्त्या ऋषींची प्रार्थना केली. मंत्रसामर्थ्याने महान असणारे ते ऋषिगण, यांनी सरळ 'इंद्राय तक्षकाय स्वाहा' म्हणत आहुती दिली.
या मंत्राने मात्र, स्वर्गलोकातला इंद्र आपल्या जागेवरून तक्षकासह खाली पृथ्वीवर यज्ञकुंडातील आहुतीसाठी येऊ लागला. हे पाहून इंद्राने घाबरून,तक्षकाला सोडून दिले. तक्षक झपाट्याने यज्ञकुंडाकडे येऊ लागला. त्यावेळी आपला मामा असलेला तक्षक, याला वाचवायला 'आस्तिक' यज्ञाच्या ठिकाणी, त्याची माता जरत्कारु हिच्या आज्ञेने आला. 'अस्तिकाला' बघीतल्यावर राजा जनमेजयाने, त्याला हवे ते मागण्यास सांगीतले. अस्तिकाने, त्याच्या निश्चयानुसार आणि मातेच्या आज्ञेनुसार, 'हा सर्पयज्ञ येथेच थांबवावा' हे मागीतले. आपल्या वचनाने बांधल्या गेलेल्या राजाला, तो सर्पयज्ञ नाईलाजाने, खिन्न मनाने तेथेच थांबवावा लागला. तक्षकाला मंत्रप्रभावातून मुक्ती दिली.
या सर्व उपकाराची जण ठेवून सर्पजातीने, अस्तिकाला वचन दिले, की 'जिथे कुठे तुझा वास असेल, तुझे आख्यान सुरु असेल, वा तू कोणत्याही प्रकारे तिथे असशील, त्याला आम्ही त्रास देणार नाही.' ज्या दिवशी हा सर्पयज्ञ बंद झाला, ती पंचमी होती. आजही आपण ती तिथी 'नागपंचमी' म्हणून साजरी करतो.