Shambhu Gopal Prabhu Desai 's Album: Wall Photos

Photo 881 of 1,471 in Wall Photos



दत्ताचे २४ गुण-गुरु




श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधात यदु आणि अवधूत यांचा संवाद आहे. `आपण कोणते गुरु केले आणि त्यांपासून काय बोध घेतला', हे यात अवधूत सांगतो. (येथे ‘गुरु’ हा शब्द वापरला असला, तरी तो ‘शिक्षक’ या अर्थाने वापरला आहे.) अवधूत म्हणतो, जगातील प्रत्येक गोष्टच गुरु आहे; कारण प्रत्येक गोष्टीपासून काहीना काही शिकता येते. वाईट गोष्टींपासून कोणते दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टींपासून कोणते सद्गुण घ्यायचे, हे शिकायला मिळते. वानगीदाखल पुढे दिलेल्या चोवीस गुरूंपासून थोडे थोडे ज्ञान घेऊन मी त्याचा समुद्र बनवला आणि त्यात स्वतः स्नान करून सर्व पापांचे क्षालन केले.

दत्ताचे २४ गुण-गुरु

१. पृथ्वी

पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि द्वंद्वसहिष्णू असावे.

२. वायू

सुमन गंध वेचणें । दशदिशास वाटणें ।
अनिल-नीती मधुरतरा । मानवे न तुज कशी ।।
भावार्थ : वारा सुगंधी फुलावरून वहातांना सुगंधाने आसक्त होऊन तो तेथे थांबत नाही, त्याचप्रमाणे द्रव्यासारख्या वस्तूला मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नयेत.

३. आकाश

आत्मा हा आकाशाप्रमाणे सर्व चराचर वस्तूंना व्यापून राहिला आहे, तरी निर्विकार, एक, सर्वांशी समत्व राखणारा, निःसंग, अभेद, निर्मळ, निर्वैर, अलिप्त आणि अचल आहे.

४. पाणी

मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वांसमवेत स्नेहभावाने वागावे. कोणाचाही पक्षपात करू नये. (पाणी मधुर असते, ते मनुष्याची तहान शांत करते. त्याप्रमाणे ज्ञानतृष्णा पूर्ण करावी.)

५. अग्नि

मनुष्याने अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे आणि जे मिळेल ते भक्षण करून कोणत्याही दोषांचे आचरण न करता आपले गुण कार्यकारणप्रसंगीच योग्य ठिकाणी वापरावे.

६. चंद्र

अमावास्येची सूक्ष्म कला आणि पंधरवड्याच्या पंधरा कला मिळून चंद्राच्या सोळा कला मोजण्यात येतात. ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणे-अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही, तद्वत् आत्म्यास देहासंबंधीचे विकार बाधक होत नाहीत. (आपला आत्मा वाढत नाही आणि मरतही नाही, तर वाढतो किंवा मरतो, तो आपला देह.)

७. सूर्य

सूर्य भविष्यकालाचा विचार करून जलाचा संचय करतो आणि योग्य काळी परोपकारार्थ त्याचा भूमीवर वर्षाव करतो. त्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संचय करून, देश, काल, वर्तमानस्थिती लक्षात आणून निष्पक्षपातीपणाने सर्व प्राण्यांस त्यांचा लाभ द्यावा; पण त्याचा अभिमान बाळगू नये.

८. कपोत

जसा बहिरीससाणा कपोताला (कबुतराला) परिवारासहित भक्षण करतो, तसे जो मनुष्य स्त्री-पुत्रादिकांचे ठायी आसक्त राहून संसार सुखमय मानून वागतो, त्याला काळ भक्षण करतो. यास्तव मुमुक्षूने या सर्वांपासून मनाने अलिप्त असावे.

९. अजगर

जसा अजगर मनात भय न बाळगता प्रारब्धावर विश्वास ठेवून एका ठिकाणी पडून रहातो आणि ज्या ज्या वेळी जे जे मिळेल ते ते भक्षण करून संतोष पावतो, त्यात अल्प-अधिक किंवा कडू-गोड असा विचार करत नाही, काही काळ खावयास मुळीच मिळाले नाही, तरी घाबरत नाही आणि अंगात शक्ती असतांनाही तिचा उपयोग करावयास जात नाही, तद्वत् मुमुक्षूंनी प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्पस्वल्प जे काही मिळेल, ते भक्षण करून, प्रसंगी काही मिळाले नाही, तरी स्वस्वरूपी लय लावून बसावे.

१०. समुद्र

जसा समुद्र वर्षाकालात अनेक नद्यांनी अपरिमित जल आणल्यास सुखी होत नाही किंवा न आणल्यास दुःखी होत नाही आणि त्यामुळे वर्धमान किंवा क्षीणतनू (कृश) होत नाही, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याने स्वधर्माधीन राहून सुखोपभोगांचा लाभ झाल्याने सुखी होऊ नये किंवा दुःखपरंपरा कोसळल्याने दुःखी होऊ नये, सदैव आनंदभरित असावे.

११. पतंग

पेटवलेल्या दिव्याचे विस्तारलेले मोहक तेज पाहून पतंग मोहित होतो आणि त्यावर झडप घालून जळून मरतो. त्याचप्रमाणे जो मनुष्य स्त्रीविलासाकरता, स्त्रीची लावण्यता आणि युवावस्था पाहून मोहित होतो, तो पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो.

१२. मधमाशी आणि मधुहा

अ. मधमाशी

मधमाशी पुष्कळ कष्ट करून अडचणीच्या ठिकाणी, उंच वृक्षावर पोळे बनवून त्यात मध साठवते. तो ती स्वतःही खात नाही आणि दुसर्‍या कोणास खाऊ देत नाही. शेवटी मध जमा करणारे मधुहा अचानक येऊन, तिचा प्राण घेऊन पोळ्यासह मध घेऊन जातात. त्याप्रमाणे जो कृपण महत्प्रयत्न करून द्रव्यार्जन करून त्याचा संग्रह करतो, तो ते द्रव्य अग्नी, चोर किंवा राजा यांनी एकाएकी हरण करून नेल्यामुळे शेवटी दुःख पावतो किंवा त्यास अनीतीमान संतती प्राप्त होऊन ती त्या द्रव्याचा अपव्यय करते किंवा तो निपुत्रिक मरण पावतो. याप्रमाणे तो कालवश झाल्यावर ते द्रव्य जेथल्या तेथे रहाते अगर भलत्याला प्राप्त होते. मरते वेळी त्याची त्या द्रव्यावर इच्छा राहिल्यास तो पिशाच किंवा सर्प होऊन ते द्रव्य वापरणार्‍याला उपद्रव देतो. याप्रमाणे धनसंचय केल्यामुळे अचानक मरणाची प्राप्ती होते, हा उपदेश मधमाशीपासून घेऊन द्रव्यसंचय करण्याचे सोडून द्यावे.

आ. मधुहा

ज्याप्रमाणे मधुहा काही उद्योग केल्यावाचून मधाची प्राप्ती करून घेतो, त्याचप्रमाणे साधक पुरुषाने चूल, भांडीकुंडी, अग्नी, लाकूड इत्यादी जमवाजमव करण्याची खटपट न करता गृहस्थाश्रम्याच्या घरचे सुसज्ज अन्न मिळवून भक्षण करावे आणि ईश्वरप्राप्तीच्या उद्योगाकडे त्या वेळेचा उपयोग करावा. असे मुमुक्षू गृहस्थाश्रमीजनांचे अन्न खाऊन त्यांचे कल्याणच करतात.

१३. गजेंद्र (हत्ती)

हत्ती बलवान असला, तरी त्यास वश करण्यासाठी माणसे भूमीत खड्डा खणून त्यावर गवत पसरतात. त्यावर काष्ठाची एक हत्तीण करून तिला गजचर्म पांघरतात आणि त्या खड्ड्यावर उभी करतात. तिला पाहून हत्ती विषयसुखलालसेने लुब्ध होऊन शीघ्र गतीने त्या काष्ठाच्या हत्तिणीसन्निध येतो आणि त्या खड्ड्यात पडतो. त्यामुळे सहजी मनुष्याच्या हातात सापडतो. त्याप्रमाणे जो पुरुष स्त्रीसुखास भुलतो, तो त्वरित बंधनात येऊन पडतो.

१४. भ्रमर

सूर्यविकासी कमळे सूर्य मावळताच मिटतात. अशा वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो. यावरून ‘विषयासक्तीने बंधन प्राप्त होते’, हे जाणून विषयांत आसक्ती बाळगू नये.

१५. मृग

पवनाप्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती लागत नाही, असा कस्तुरीमृग मधुर गायनाला लुब्ध होऊन आपला प्राण परस्वाधीन करतो. हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात अडकू नये.

१६. मत्स्य

लोखंडाच्या गळाला मांस बांधून पाण्यात सोडल्यावर ते मांस पाहून भुलल्यामुळे मत्स्य तो गळ गिळतात आणि गळ तोंडात अडकल्यामुळे प्राणास मुकतात. त्याप्रमाणे मनुष्य जिव्हेच्या स्वादात बद्ध झाल्याने जन्म-मरणरूपी भोवर्‍यात गोते खात रहातो.

१७. पिंगला वेश्या

एके रात्री बराच काळ वाट पाहूनही एकही पुरुष पिंगला वेश्येकडे आला नाही. वाट बघून आणि आशेने एकसारखे आत-बाहेर येऊन ती कंटाळली आणि तिला अचानक वैराग्य आले. जोपर्यंत मनुष्याच्या अंगी आशा प्रबल असते, तोपर्यंत त्याला सुखनिद्रा लागत नाही. ज्या पुरुषाने आशेचा त्याग केला, त्याला या संसारात एकही दुःख बाधत नाही.

१८. टिटवी

एकदा एक टिटवी चोचीत मासा धरून चालली आहे, हे पाहून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागले आणि तिला टोचा मारून, हतबल करून तो मासा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागले. ती जिथे जिथे जाई, तिथे तिथे हे सैन्य तिचा पाठलाग करी. शेवटी ‘दे माय धरणी ठाय’ होऊन तिने एकदाचा तो मासा टाकून दिला. तोच एका घारीने त्याला पकडले. हे बघण्याचाच उशीर, टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारी त्या मासा उचलणार्‍या घारीचा पिच्छा पुरवू लागले. त्यामुळे ती टिटवी निश्चिंत होऊन एका झाडाच्या फांदीवर जाऊन शांतपणे बसली. या संसारात उपाधी झुगारून देण्यातच शांती आहे, नाहीतर घोर विपत्ती.

१९. बालक

मानापमानाचा विचार न करता जगतास प्रारब्धाधीन समजून, सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे रहावे आणि आनंद भोगावा.

२०. कंकण

दोन कंकणे (बांगड्या) एकावर एक आपटून त्यांचा आवाज होतो. अनेक कंकणे असली, तर जास्त आवाज होतो. त्याप्रमाणे दोन माणसे एकत्र राहिल्यास वार्तालाप होतो आणि ज्या ठिकाणी पुष्कळ माणसे एकत्र वास करत असतील तेथे कलह होतो. दोन्हीमुळे मनोवृत्ती शांत होत नाही. याकरता ध्यानयोगादी करणार्‍याने निर्जन प्रदेश शोधून काढून त्या ठिकाणी एकटे रहावे.

२१. शरकर्ता (शरकार, शरकट, कारागीर)

एके दिवशी एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाचे पाते सिद्ध करत बसला होता. त्याच्याजवळून राजाची स्वारी वाजतगाजत थाटात गेली. मागाहून एक मनुष्य आला आणि त्याने त्याला विचारले, ‘‘या वाटेने राजाची स्वारी गेली, तिचे तुम्ही अवलोकन केले काय ?’’ त्यावर कारागीर उत्तरला, ‘‘मी आपल्या कामात गर्क असल्यामुळे मला ते कळले नाही.’’ या कारागिराप्रमाणे मुमुक्षूने सर्व इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन करून ध्यान धरावे.

२२. सर्प

दोन सर्प कधीही एकत्र रहात नाहीत किंवा समागमे फिरत नाहीत. ते आवाज न करता सावधपणे फिरतात, आपल्याकरता रहाण्यास घर न करता वाटेल त्याच्या घरात जाऊन रहातात. ते उघड रितीने फिरत नाहीत, प्रमाद (दोष) नसता निंदाही करत नाहीत आणि अपकार केल्यावाचून कोणावर कोप करत नाहीत. त्याप्रमाणे दोन बुद्धीमंतांनी कधी एकत्र फिरू नये, परिमित भाषण करावे, कोणाशी भांडण-तंटा करू नये, विचाराने वागावे, सभा करून भाषण करू नये आणि स्वतःच्या रहाण्यासाठी मठ न बांधता वाटेल तेथे राहून आयुष्य घालवावे. रहाण्यासाठी घर बांधल्यास अभिमान उत्पन्न होतो आणि त्यामुळे लोभ जडतो.

२३. कोळी (कांतीण)

कोळी आपल्या नाभीतून तंतू काढून त्यांचे घर बनवतो आणि त्यात अहोरात्र क्रीडा करतो. पुढे मनास वाटेल, तेव्हा पुन्हा त्या घरास गिळून कोळी स्वतंत्र होतो. तसाच ईश्वर इच्छामात्रेकरून जग उत्पन्न करून त्याच्याशी नाना खेळ करतो आणि मनास येईल, तेव्हा त्याचा इच्छामात्रेच नाश करून आपण एकटा रहातो. जसा कोळी पुनःपुन्हा तंतू काढून घर करू शकतो, त्याप्रमाणे ईश्वर इच्छामात्रे चराचर जग उत्पन्न करून त्याचा आपल्याच अंगी लय करून पुन्हा मनास येईल, तेव्हा पूर्ववत ते निर्माण करतो. असे असल्याने जगातील घटनांना महत्त्व देऊ नये.

२४. पेशकार (भ्रमरकीट, कुंभारीणमाशी)

सति सक्तो नरो याति सद्भावं ह्येकनिष्ठया ।
कीटको भ्रमरं ध्यायन् भ्रमरत्वाय कल्पते ।। – विवेकचूडामणि, श्लोक ३५८
अर्थ : भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमरपणाला पावतो तद्वत् एकनिष्ठपणाने परमात्वतत्वाचे चिंतन करणारा योगी परमात्मरूपास पावतो.
विश्लेषण : जो प्राणी सदैव ज्याचे ध्यान करतो, तो त्या ध्यानामुळे परिणामी तदाकार होऊन जातो. कुंभारीणमाशी मातीचे घर करून त्यात एक किडा आणून ठेवते आणि त्यास वरचेवर येऊन फुंकर मारत रहाते. त्यामुळे त्या किड्याला माशीचे ध्यान लागून रहाते आणि तो शेवटी कुंभारीणमाशी बनतो. त्याप्रमाणे मुमुक्षूने गुरूपदिष्ट मार्गाने ईश्वराचे ध्यान धरावे, म्हणजे तो ईश्वरस्वरूप होतो.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दत्त’