Shambhu Gopal Prabhu Desai 's Album: Wall Photos

Photo 1,352 of 1,471 in Wall Photos

https://youtu.be/GlRJqlrnnFc

कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांची आज जयंती ....
त्यानिमित्त त्यांच्या * चाफा बोलेना * या प्रसिद्ध कवितेचे अध्यात्मिक नजरेतुन केलेले रसग्रहण ...

* चाफा बोलेना *

चाफा बोलेना, चाफा चालेना |
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना ||

गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणी |
आम्ही गळयांत गळे मिळवूनी रे |

गेले केतकीच्या बनी,
गंध दरवळला मनी |
नागासवे गळाले देहभान रे |
चल ये रे, ये रे गडया,
नाचू उडू घालू फुगडया |
खेळू झिम्मा झिम पोरी ,
झिम पोरी झिम ||

हे विश्वाचे आंगण ,
आम्हा दिले आहे आंदण |
उणे करु आपण दोघे जण |
जन विषयाचे किडे ,
ह्यांची धाव बाह्याकडे |
आपण करु शुद्ध रसपान रे |
चाफा फुले आला फुलून ,
तेजी दिशा गेल्या आटून ,
कोण मी चाफा,
कोठे दोघे जण रे ||

- कवी बी

रसग्रहण\u2b07

ही कविता शुद्ध अद्वैत वेदान्त तत्त्वज्ञानाचं प्रतिपादन करणारी आहे.

इथे चाफा म्हणजे सोनचाफा ! अन्य फुलांप्रमाणे याला फारसा आकर्षक आकार वा रंग नसतो, असतो तो अत्यन्त मादक सुगंध! म्हणजे याचं सुख हे बाह्य स्थूल दृश्य नसून अंतरंगी चा सुगंध असतं. बाकीची फुलं दूर अंतरावर असली तर त्यांचा वास येत नाही, चाफा कितीही लपवला तरी याचा सुवास लपत नाही! अन्य फुलं सुकल्यावर त्यांचा सुगंध कमी होतो, चाफ्याचं तसं नसतं!

असा हा चाफा इथे आत्मानुभवाचं , आध्यात्मिक पातळीवर जीव-शिवाच्या ऐक्याचं प्रतीक म्हणून कविने वापरला आहे. चाफा म्हणजे स्वतःला आतून येणारा अनुभव ... चाफा फुलेना म्हणजे प्रयत्न करूनही आत्मसुखाचा अनुभव येत नाहीय ...

पहिल्या दोन ओळी (ध्रुवपद):
चाफा खंत करत नसून , काही केल्या चाफा फुलत नाही याची खंत वाटते ..

चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा, खंत! करी काही केल्या फुलेना

इथे अध्यात्ममार्गाच्या एका साधकाच्या मनातील तळमळ व्यक्त होत आहे... प्रयत्न करूनही किती काळ लोटला तरी साधनेचं फल मिळत नाही, त्या आत्मसुखाचा अनुभव येत नाही... "करी" म्हणजे कर्मेन्द्रियांच्या द्वारे काहीही केलं तरी चाफा फुलत नाही म्हणजे आत्मानुभवाची प्राप्ति होत नाही !

पुढच्या कडव्यात जीवनात प्रपंच व परमार्थाच्या वाटेवर केलेल्या प्रयत्नांचं वर्णन आहे. दोन ओळी:

गेले आंब्याच्या बनी ,
म्हटली मैनासवे गाणी
आम्ही गळयांत गळे मिळवूनी रे. ..

ही प्रापञ्चिक सुखासाठी केलेली धडपड आहे... साहित्यामध्ये काम-पुरुषार्थाशी जोडून आंबा, आम्रवृक्ष, आम्रमंजरी यांचा वापर नेहमीच झाला आहे. सन्तानप्राप्ती ही वैवाहिक जीवनाची सफलता मानली जाते, मातृत्व ही स्त्रीच्या जीवनाची परिपूर्णता मानली जाते....

त्यामुळे आम्ही प्रपंचात आंब्याच्या वनात गेलो, कोकिळमैनेबरोबर गाणी म्हटली, गळ्यात गळे घातले... म्हणजे भावनात्मक स्तरावर कौटुंबिक जीवनाची सर्व सुखं धुंडाळून पाहिली.... पण ........
" चाफा, खंत! करी काही केल्या फुलेना " सर्व प्रापंञ्चिक सुखं क्षणिक ठरली, त्यात दीर्घकाळ टिकण्याची क्षमता नव्हती. त्यामुळे प्रपंञ्चात कितीही क्षणिक सुखं लाभली तरी सार्वकालिक परिपूर्ण अशा आत्मानुभवाच्या पासंगालाही ती सुखं उभी राहू शकली नाहीत!

याच कडव्यातील दुसरा भाग आध्यात्मिक साधनेच्या वाटेवर केलेल्या प्रयत्नांचा संकेत करतो:

इथलं रूपक फारच विलक्षण आहे. केवड्याची रचना जगावेगळी... बाहेरून काटेरी, मधोमध सरळसोट उभा दांडा आणि त्याच्या टोकाला श्रेष्ठ सुगंधानं परिपूर्ण सोनेरी कणीस....! त्याच्याभोवती सापांचा वावर असतो.

गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला मनी
नागासवे गळाले देहभान रे...

हा साधकाने केलेला योगमार्गाच्या साधनेचा प्रयत्न सुचवला आहे.... इथे केतकीचे बन म्हणजे योगमार्ग ... केतकीचे काटे म्हणजे योगमार्गाचा खडतरपणा सुचवतात.... आंब्याच्या वनातलं सुख इतरांबरोबर उपभोगलं होतं (म्हटली मैनासवे गाणी), इथे केतकीच्या सुगंधाचं रसपान माञ फक्त स्वतःच्या अंतरंगात केलं आहे... " गंध दरवळला मनी "....
आणि हे योगमार्गाचंच वर्णन असल्याचा आणखी एक संकेत कविने दिला आहे . " नागासवे गळाले देहभान ".... योगाद्वारे जागृत केल्या जाणार्‍या आत्मशक्ति कुंडलिनीला नागिणीची उपमा तर योगशास्त्रानेच दिलेली आहे!....
ध्यानाचा अभ्यास करताना कुंडलिनी जागृत होऊन देहभान गळालं आणि ध्यानाच्या अवधिमध्ये विलक्षण आत्मीक अनुभव मिळाला असा या कडव्याचा अर्थ ....
तरीही हा अनुभव ध्यानाच्या तेवढ्या वेळेपुरता मर्यादित राहिला... सार्वकालिक ( सतत ) आत्मानुभवाचा आनन्द तिथेही मिळाला नाही... " चाफा, खंत. ! करी काही केल्या फुलेना! "

या कडव्यातल्या " नाचू उडू घालू फुगडया.... खेळू झिम्मा झिम पोरी झिम..." या शब्दांच्या द्वारे जणु सुचवलं आहे की वरचे सगळे प्रयत्न शेवटी पोरखेळ ठरले, झिम्मा फुगड्यांप्रमाणे ... थोड्या वेळाकरीता मनोरंजन झालं बस !!

पुढचं कडवं हे वेदान्त तत्त्वज्ञानाचं
स्पष्ट प्रतिपादन आहे....

हे विश्वाचे आंगण,
आम्हा दिले आहे आंदण
उणे करु आपण दोघे जण..

इथे " आम्ही दोघे " हे रूपक फार वेगळ्या अर्थाचं!
जीव ( शरीरात जाणवणारं चैतन्य ) आणि ईश्वर ( चराचर सृष्टीचं व्यापक चैतन्य) हे वरकरणी वेगळे वाटले तरी एकाच चैतन्याची दोन रूपं आहेत...
आता या दोघांना विश्वाचं अंगण आंदण मिळालं आहे.... ईश्वराने विश्वाचं संचालन करावं, आणि जीवानं ( साधकानं ) त्या जगाशी व्यवहार करावा...
अर्थात जीवानं करावयाचा व्यवहार हा कर्तव्य, जबाबदार्‍या अशा प्रकारचं लादलेलं ओझं नसून मनसोक्त उपभोगण्यासाठी मिळालेलं आन्दण म्हणून त्याने जगाकडे पहावं!

आणि म्हणूनच कविने जगाच्या रूपात मिळालेल्या आन्दणाला " उणे करण्याची " शब्दयोजना केली आहे!! इथे जीव ईश्वराला उद्देशून म्हणतो की आपण दोघे मिळून आपल्या स्वतःच्या अस्तित्वाव्यतिरिक्त जाणवणार्‍या या जगाच्या प्रचीतिचा बाध करूया, नाश करूया, निरास करूया !!!

जन विषयाचे किडे ,
ह्यांची धाव बाह्याकडे ,
आपण करु शुद्ध रसपान रे...

हे सुद्धा साधकाचे ईश्वराला उद्देशूनचे शब्द! बाकीचं जग लौकिक व्यवहारात लडबडलं आहे, त्याला तसंच राहू दे... तू आणि मी एक होऊन आपल्या दृष्टितून या जगाच्या आत्मभिन्न प्रतीतिचा नाश करूया. !

आणि अचानक ती घटना घडली!!!

चाफा फुले आला फुलून |
तेजी दिशा गेल्या आटून |
कोण मी चाफा, कोठे दोघे जण रे ||

चाफा फुलला....
जीवशिवाच्या एकात्मस्वरूपाचा बोध झाला....
त्या तेजामध्ये दिशा, काळ ही दृश्य जगाच्या भेदाच्या कल्पनेची परिमाणं विरून गेली !!
हा एकात्मतेचा अनुभव इतका परिपूर्ण आहे की तिथे " कोण मी चाफा " मी आणि माझा आत्मानुभव यात भेद राहीला नाही....
" कोठे दोघे जण रे " मी सीमित अस्तित्व असलेला जीव आणि व्यापक अस्तित्व असलेला ईश्वर हाही भेद उरला नाही ....

ही कविता हे एका आत्मानुभवाशी जवळीक साधलेल्या श्रेष्ठ आध्यात्मिक साधकाचे उद्गगार आहेत इतकंच म्हणता येईल ..