तेच डोळे देखणे
जे कोंडीती सार्या नभा ।
वोळिती दुःखे जनांच्या
सांडिती नेत्रप्रभा ॥
देखणे ते ओठ की जे
ओविती मुक्ताफळॆ ।
आणि ज्यांच्या लाघवाने
सत्य होते कोवळे ॥
देखणे ते हात ज्यांना
निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले
सुंदराचे सोहळॆ ॥ @कविवर्य बा. भं. बोरकर
पु ल.नी एका पुस्तकात हे जग मी सुंदर करुन जाईन असं म्हटलंय. जगाचं दु:ख कमी करावं अशा आशेनं ज्यांच्याकडे जनांनी पाहावं नि त्यांनीच नैराश्येने म्रुत्यूला कवटाळावं हे असह्य आहे.
ज्यांनी म्रुत्यू अनुभवलेला असतो ते इतरांसाठी जगतात. जगण्यातल्या दु:खातून सुटका व्हावी म्हणून लोक अशा विभूतींना शरण जातात. त्यांच्यात लोक इश्वर शोधतात.
अशी व्यक्ति संतपदाला पोहोचत असावी. त्यांना नैराश्य कसं येऊ शकेल? भय्यूजी महाराजांनी मात्र संतांचीही नैराश्यातून सुटका नाही हा संकेत दिला का? मग हे जग सुंदर करायला कोणी पुढे यावं?